काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान, शस्त्रास्त्र जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 08:37 AM2017-09-25T08:37:09+5:302017-09-25T08:39:31+5:30
रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
श्रीनगर- रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरलं होतं तसंच दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू होता. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकाबंदीही केली होती. रविवारी रात्री उशिरा तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराने या तीन दहशतवाद्यांकडून 2 एके 47 रायफल, एक एके युबीजीएल, काही ग्रेनेड्स, पेट्रोल बॉम्ब, 2 आयईडीएस आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी चकमक सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांना चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांकडून सुरू असलेले ऑपरेशन ऑल आऊट बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचं सांगितलं. तसेच काश्मीर खोऱ्यातील विशेषत: दक्षिण काश्मिरमधील परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दहशतवादाच्या मार्गाने जाऊन हातात हत्यार घेणाऱ्या काश्मिरी तरुणांनी दहशतवादाचा रस्ता सोडावा, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने जम्मू, सांबा आणि पूंछ जिल्ह्यात भारतीय सीमांवरील चौक्या, तसंच नागरी वस्त्यांवर शनिवारी रात्रभर गोळीबार केला. यात बीएसएफचे दोन जवान आणि पाच गावकरी जखमी झाले. सीमावर्ती भागातील २० गावांना पाकिस्तानने लक्ष्य केल्याने, या भागातील शेकडो लोकांना घर सोडून जावं लागत आहे. गत काही दिवसांत अरणिया आणि आरएस पुरा या भागातील २० हजार लोकांनी गाव सोडलं आहे.
अधिका-यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने अरणिया, आरएस पुरा आणि रामगढ सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळपासून गोळीबार सुरूके ला. गोळीबारात आरएस पुरा सेक्टरच्या सतोवाली गावात तीन लोक जखमी झाले. अरणिया सेक्टरमध्ये एक जण जखमी झाला. सांबाच्या रामगढ सेक्टरमध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. पूंछ भागात पाकच्या गोळीबारात ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. पोलिसांनी ५०० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यांना शिबिरात ठेवले आहे.
पाकिस्तानने १३ ते १८ सप्टेंबर सातत्याने गोळीबार केला. दोन दिवसांनंतर, २१ तारखेपासून गोळीबार सुरू झाला आहे. त्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या वर्षी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या २८५ घटना घडल्या आहेत. ही संख्या २०१६ मध्ये २२८ होती. सीमेवर सतत होणा-या गोळीबारामुळे अनिता कुमार यांच्यासारखी अनेक कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. त्यांना गुरुवारी रात्री घरात पलंगाखाली लपून राहावे लागले. या गोळीबाराला त्रासून घर सोडण्याचा निर्णय त्यांनी शुक्रवारी घेतला