पद्म पुरस्कारासाठी दिल्लीतून तिघांची नावे; मुख्यमंत्री केजरीवालांचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 10:53 AM2021-08-29T10:53:41+5:302021-08-29T10:53:48+5:30
दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात.
- विकास झाडे
नवी दिल्ली : कोविड काळात आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या तीन व्यक्तींची नावे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे पाठविलेली तिघांची नावे जाहीर करून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरोधात राजकारण केले आहे.दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात. कोणाला पुरस्कार द्यायचा किंवा नाही यावर मात्र राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब होते.
राज्यांनी पाठविलेली नावे ही याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नाहीत. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र यासाठी पत्रकार परिषद आयोजित करून आरोग्य क्षेत्रातील तिघांची नावे जाहीर केलीत. त्यांना शुभेच्छाही दिल्यात आणि केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्कार द्यावा अशी विनंती केली आहे.
देशात सर्वात प्रथम प्लाझ्मा बॅँक सुरू केलेल्या आएलबीएस हॉस्पिटलचे डॉ. ए. के. सरीन, एलएनजेपी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश कुमार आणि मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. संदीप बुद्धीराजा यांचा समावेश आहे. केजरीवाल म्हणाले, एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये कोविडच्या २०५०० रुग्णांवर उपचार करण्यात आला. हा आकडा देशात सर्वाधिक होता.
अशीही ‘पारदर्शकता’-
आपल्या कोणत्याही कामाची केंद्र सरकार दखल घेत नाही असा समज करून अलीकडे मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आम्ही केंद्राकडे कोणत्या मागण्या केल्या या माध्यमांकडे जाहीर करतात. त्याला केजरीवाल सरकारने ‘पारदर्शकता’ असे नाव दिले आहे. या पारदर्शकतेच्या श्रृंखलेत त्यांनी आज पद्म पुरस्कारासाठी ज्यांची नावे पाठवलीत ती जाहीर केली.