नवी दिल्ली : पेट्रोलपंपांवर प्रदूषणरोधक प्रणाली न लावल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, या तीन सरकारी कंपन्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे. पेट्रोल, डिझेल भरताना वाहनांच्या टाकीतून निघणारी बाष्प (वाफ) वातावरणात मिसळू नये, यासाठी हे बाष्पकण रोखण्यासाठी प्रदूषणरोधक प्रणालीतहत बाष्प प्रगहण (व्हेपर यंत्र) बसविणे जरूरी आहे.१२ डिसेंबर रोजी स्वतंत्रपणे या तिन्ही तेल कंपन्यांना जारी करण्यात आलेल्या नोटिसीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एस. पी. एस. परिहार यांनी म्हटले आहे की, मंडळाच्या पथकाला पेट्रोलपंपांच्या तपासणीत बाष्प प्रगहण प्रणाली नसल्याचे किंवा ही प्रणाली कामच करीत नसल्याचे आढळून आले. त्याबाबत मंडळाने या तीन कंपन्यांकडून खुलासा मागविला होता.कंपन्यांकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण भरपाईपोटी तीन कंपन्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. वातावरणात बेंझिन मिसळविणारा मुख्य स्रोत पेट्रोलपंप आहे. हे रोखण्यासाठी पंपांवर हे यंत्र लावणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशाचे पालन करण्याबाबतचा अहवाल या तीन कंपन्यांनी सादर करावा, असेही परिहार यांनी म्हटले आहे. सर्व पेट्रोलपंपांवर ३१ आॅक्टोबपर्यंत उपरोक्त यंत्रे बसविण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिले होते.
तीन तेल कंपन्यांना प्रत्येकी एक कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 3:22 AM