पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात पटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 11:28 AM2021-12-01T11:28:39+5:302021-12-01T11:28:50+5:30
या स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कोलकाता:पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सतगाचिया विधानसभा क्षेत्रातील बजबाज परिसरात बुधवारी सकाळी अवैधरित्या सुरू असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाल आहे, तर काहीजण जखमी आहेत. मृतांमध्ये मालक असीम मडा, त्याची मावशी आणि एका मजुराचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 8.15 च्या सुमारास बजबाज-2 ब्लॉकच्या नोदाखली पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला.
आवाजाने घराच्या काचा फुटल्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका जोरदार होता की, जवळच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तृणमूलचे स्थानिक नेते बुकन बॅनर्जी यांच्यासह नोदाखली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आता कारखान्याच्या मालकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा कसा केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे फटाके बनवले जातात. याआधीही बेकायदा फटाके बनवताना स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस दल परिसरात तपास करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा या परिसरात कसा पोहोचला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.