डॉक्टर होण्यासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 3 मुली NEET परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत आणि आता डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करणार आहेत. कुटुंबासाठी हा एक अतिशय खास प्रसंग आहे. विशेष म्हणजे या तिन्ही बहिणी पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. अर्बिश, रुतबा बशीर आणि तुबा बशीर यांचं कुटुंब मूळचं श्रीनगरमधील नौसेरा येथील आहेत.
NEET परीक्षेचा निकाल जाहीर होताच तिन्ही बहिणींच्या यशाची देशभर चर्चा होत आहे. अर्बिश, रुतबा बशीर आणि तुबा बशीर या तिघी चुलत बहिणी आहेत. आपल्या यशाबद्दल अर्बिश म्हणाली की, "मी खूप आनंदी आहे, आजपर्यंत आमच्या कुटुंबात एकही डॉक्टर नव्हता. डॉक्टर व्हायचं हे स्वप्न होतं. पालकांनी आम्हाला सुरुवातीपासून पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे आज आपण डॉक्टर बनण्यास तयार आहोत."
NEET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या रुतबा बशीरने सांगितलं की, अकरावीपासून NEET परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश मिळालं हे चांगलं आहे. आमच्या यशाचं श्रेय आमच्या पालकांना जातं, त्यांनी आम्हाला लहानपणापासून साथ दिली. तुबा बशीर म्हणाली की, 'आम्ही तिघीही NEET परीक्षा एकत्र उत्तीर्ण झालो आहोत कारण आम्ही एकत्र शाळेत आणि कोचिंगला जायचो. एमबीबीएसची परीक्षा पास होऊन डॉक्टर होऊ, असा विचार आहे. मी खूप आनंदी आहे कारण मी खूप मेहनत केली आणि त्याचे फळ मिळालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.