बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 07:44 AM2020-09-29T07:44:33+5:302020-09-29T07:51:51+5:30
घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.
बडोदा : गुजरातमधील बडोद्यातील बावामाणपुरा परिसरातील बांधकाम सुरु असलेली तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असलेली ही तीन मजली इमारत आधीपासूनच एका बाजूला झुकलेली होती. याबाबत येथील लोकांनी प्रशासनाकडे तक्रारही केली होती. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा ही इमारत कोसळली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, इमारत कोसळल्याने येथील अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाताच बचावकार्यासाठी सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या. तसेच सध्या या इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Gujarat: Three persons died after an under-construction building collapsed in Bawamanpura in Vadodara late last night. Rescue operation underway. pic.twitter.com/7xE1i1Xvjc
— ANI (@ANI) September 28, 2020
दरम्यान, महिनाभरापूर्वीही अहमदाबादमध्ये एक व्यावसायिक इमारत कोसळली होती. त्यामध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली होती. भिवंडीमध्ये गेल्या २१ सप्टेंबरला पहाटे ३.४५ च्या सुमारास पटेल कंपाऊंडची जुनी जीलानी इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.