श्रीनगर - अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं आहे. अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले होते. दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर जवानांनी या दहशतवाद्यांना ठार केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चकमकीदरम्यान पळून जाण्यात यशस्वी झालेल्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली. अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयातून त्याला अटक केली.
सोमवारी जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर काझीगुंड येथे जवानांचं पथक श्रीनगरला जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर ही चकमक सुरु झाली होती. यावेळी एक जवान शहीद झाला होता, तर एक जखमी झाला होता. यानंतर सुरक्षा जवानांनी परिसराला घेराव टाकत दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या सर्च ऑपरेशनचं रुपांतर चकमकीत झालं. पहाटे 2 वाजेपर्यंत ही चकमक सुरु होती.
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यावर बसिर, अबु फुरकान आणि अबु माविया अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. यावर बसिर हा कुलगाममधील असून फेब्रुवारी महिन्यात तो लष्कर-ए-तोयबात भर्ती झाला होता. त्याने एका पोलिसाकडून शस्त्र चोरलं होतं.
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाल्यानंतर अबु फुरकानवर दक्षिण काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी यावर बसिर, अबु फुरकान आणि अबु माविया अमरनाथ हल्ल्यात सामील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग आणि कुलगाम परिसरात झालेल्या अनेक दहशतवादी घटनांमध्ये फुरकानचा समावेश होता. याआधी सप्टेंबर महिन्यात अमरनाथ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईलला ठार करण्यात आलं होतं. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केलं होतं. अमरनाथमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अबू इस्माईल सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. अबू इस्माईलसोबत अजून एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होतं.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी अबू इस्माईल हल्ल्यात सहभागी होता असं सांगितलं होतं. मुनीर खान बोलले होते की, हा हल्ला तैयबानेच केला आहे. त्याची जबाबदारी अबू इस्माईलवर होती. त्याला स्थानिक दहशतवाद्यांनीही मदत केली होती.