'...त्यावेळी उद्देश जीव वाचविण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकविण्याचा नव्हता'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:17 PM2021-06-25T20:17:14+5:302021-06-25T20:18:49+5:30
काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल ८० लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन करत वेल डन इंडिया.. असेही म्हटले आहे. देशाता आता लसीकरणाची मोहीम गतीमान होत आहे. तर, दुसरीकडे जाहिरातबाजी आणि बॅनरबाजीतून मोदी सरकारकडून स्वत:चं कौतुकही होत आहे. त्यावरुन, काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारच्या गतीमान लसीकरण मोहिमेचे आभार मानण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केल्या आहेत. तर, दुसरीकडे वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजीही करण्यात आली आहे. त्यावरुनच, काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलिओचा डोस देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी ना पोस्टर्स होते, ना मोठा प्रचार. कारण उद्देश जीव वाचवण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकावण्याचा नाही!, असे म्हणत काँग्रेसने मोदींच्या लसीकरणातील जाहीरातबाजीवर टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे ट्विट शेअर केलं आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलियोचा डोस देण्यात आला होता.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 25, 2021
मात्र त्यावेळी ना पोस्टर्स होते, ना मोठा प्रचार
कारण उद्देश जीव वाचवण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकावण्याचा नाही! pic.twitter.com/5etJvaU2S9
नरेंद्र मोदींचे बॅनर झळकवण्याचे निर्देश
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी याबाबत व्हॉटसअपवरुन विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना रविवारी संदेश पाठवले आणि मोदींचे आभार व्यक्त करणारे फलक सोशल मीडियावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत, असे सांगितले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मान्यताप्राप्त डिझाईन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध असेल आणि ते सोशल मीडियाला जोडावे. या डिझाईनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून 'धन्यवाद पीएम मोदी' असा आशयही लिहिण्यात आला आहे.