नवी दिल्ली : १९९७ साली प्रसारमाध्यमातील लोकांनी केलेल्या पाठलागामुळे अपघात होऊन प्रिन्सेस डायना मरण पावली. तसा प्रकार आपल्या देशात होता कामा नये असे दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना बजावले आहे. बॉलीवूडमधील मंडळींची बदनामी करणारा कोणताही कार्यक्रम दाखवू नये असा आदेश न्या. राजीव शकधर यांनी टाइम्स नाऊ व रिपब्लिक टीव्ही या दोन वृत्तवाहिन्यांना दिला आहे.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील इतर मंडळींवरही काही आरोप झाले होते. त्याची उदंड चर्चाही झाली होती. या घटनांच्या वार्तांकनाप्रसंगी काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत बॉलीवूडमधील दिग्गजांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामध्ये आमीर खान, शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार, करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदींचा समावेश आहे.
समांतर न्यायालय बनू नका
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. राजीव शकधर यांनी म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांनी समांतर न्यायालय बनू नये. प्रसारमाध्यमांचे काम बातमी देण्याचे आहे. मात्र सध्या बातमी कमी व त्यात स्वत:ची मते अधिक अशा पद्धतीने बातम्या दिल्या जात आहेत. एखाद्या गोष्टीबद्दल आधीच निष्कर्ष काढून मग त्या अंगाने बातम्या दिल्या जातात असेही दिल्ली न्यायालयाने वृतवाहिन्यांना फटकारले.