गुजरात- विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुस-या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. टाइम्स नाऊ-व्हीएमआर यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 89 जागांसाठी 9 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान झालं होतं. तर उर्वरित 93 जागांसाठी दुस-या टप्प्यातील मतदान आज संपन्न झालंय. या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 182 जागांपैकी 109 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.टाइम्स नाऊ-व्हीएमआरनं सोशल मीडियाच्या आधारे हा एक्झिट पोल घेतला आहे. मतदारांनी टॅबलेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आले आहेत. सर्व निवडणूक सर्वेक्षण करणा-यांवर जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. त्याप्रमाणेच मतदारांनी दिलेली ऑनलाइन उत्तर रेकॉर्ड केली जात आहेत. गुजरात विधानसभा ताब्यात घेण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं या दोन्ही पक्षांनी सर्व ताकद पणाला लावली आहे.भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. गुजरातमध्ये भाजपा 22 वर्षं सत्तेत आहे. तर काँग्रेसला 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
गुजरातमध्ये 2012च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 182पैकी 115 जागा मिळवण्यात यश आलं होतं. त्यातील 6 जागा कमी होऊन भाजपाला 109 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर काँग्रेसकडे 2012च्या निवडणुकीत 61 जागा होत्या. या जागांमध्ये 9 जागांची भर पडून काँग्रेसला 61 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2012च्या निवडणुकीत मिळलेल्या 6 जागांपैकी 3 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे.