ममतांच्या नातलगाला ईडीने मध्यरात्री कार्यालयात बोलावले; ती पोहोचली, तेव्हा म्हटले आमचे चुकले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 02:26 PM2022-09-12T14:26:31+5:302022-09-12T14:28:09+5:30
ईडीने कोळसा घोटाळ्यात अभिषेक बॅनर्जींची मेव्हूणी मेनका गंभीर यांनी मध्यरात्री चौकशीसाठी बोलावले.
कोलकाता: गेल्या काही काळापासून अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) पश्चिम बंगालमध्ये अॅक्शन मोडमध्ये आहे. विविध प्रकरणात ईडीची तृणमूल नेत्यांवर कारवाई सुरू आहे. पण, यादरम्यान ईडीने एक मोठी चूक केली, ज्यामुळे टीकेचा सामना करावा लागला. ईडीने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बनर्जी यांची मेव्हूणी मेनका गंभीर यांना एका आर्थिक प्रकरणात नोटीस बजावली होती. यामुळे मेनका रविवारी मध्यरात्री ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या, पण कार्यालयाला कुलूप होते.
नेमका काय घोळ झाला..?
ईडीला मेनका गंभीर यांना सोमवारी दुपारी 12 वाजता बोलवायचे होते, पण चुकून एजंसीने त्यांना रविवारी मध्यरात्री 12ची वेळ लिहिली. यामुळे मेनका मध्यरात्री सॉल्ट लेक परिसरातील सीजीओ कॉम्प्लेक्समधील ईडी कार्यालय पोहोचल्या. तिथे गेल्यावर त्यांना ऑफीसला कुलूप दिसले, यानंतर त्या एक फोटो काढून निघून गेल्या. घडलेल्या प्रकारावर मेनका म्हणाल्या की, ईडीच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मी तयार होते, म्हणूनच दिलेल्या वेळेत ईडीच्या कार्यालयात पोहोचले. यानंतर ईडीने स्पष्टीकरण दिले की, घडलेला प्रकार टायपिंग करणाऱ्या व्यक्तीच्या चुकीने झाला आहे.
West Bengal | TMC MP Abhishek Banerjee's sister-in-law Maneka Gambhir was summoned to ED office in Kolkata at 12.30 am last night in connection with coal smuggling case. However, upon reaching the office as per the time mentioned in the summon, the office was found to be closed. https://t.co/0kfWY2uvcgpic.twitter.com/KdxYvFaU6P
— ANI (@ANI) September 12, 2022
यानंतर मेनका गंभीरने एका स्थानिक वृत्तवाहिनीशी केलेल्या बातचीतमध्ये सांगितले की, "मला रात्री 12.30 वाजता ऑफीसला यायला सांगितले होते, त्यामुळेच मी तिथे गेले." मेनका त्यांच्या वकिलासोबत ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. मेनका यांना 10 सप्टेंबर रोजी कोलकाता विमानतळावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री 12.30 वाजता कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याची गरज असल्याचे कारण देत ईडीने मेनका यांना परदेशात जाण्यापासून रोखले.
दुसरी नोटीस बजावली
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेनका यांना दुपारी 2 वाजता ईडीसमोर सादर होण्यासाठी दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने या प्रकरणात अद्याप गंभीर यांची चौकशी केलेली नाही. सीबीआयने यापूर्वीच त्यांनी चौकशी केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयने ऑगस्टमध्ये ईडीला दिल्लीऐवजी कोलकातामधील आपल्या स्थानिक कार्यालयात गंभीर यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.