'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 03:15 PM2024-12-09T15:15:44+5:302024-12-09T15:16:12+5:30
तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद बांधण्याचा दावा केला आहे.
TMC MLA West Bengal : ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद बांधण्याचा दावा केला आहे. हुमायून कबीर म्हणाले की, मुर्शिदाबाद भागातील बेलडांगा येथे नवीन बाबरी मशीद बांधली जाणार आहे. राज्यात 34 टक्के मुस्लिम आहेत, त्यांच्या भावना आणि मान उंचावून जगण्याची इच्छा आणि हक्कांसाठी हा प्रस्ताव ठेवायचा आहे. 6 डिसेंबर 2025 पूर्वी काम सुरू होईल, असा दावा त्यांनी केला.
पैशांची कमतरता भासणार नाही
हूमायून कबीर पुढे म्हणाले, मशीद बांधण्यासाठी पैशाची कमतरता भासणार नाही. बेलडांगा आणि बहरामपूर परिसरात अनेक मदरसे आहेत. सर्व मदरशांचे अध्यक्ष आणि सचिवांचा समावेश करून 100 किंवा त्याहून अधिक लोकांचा बाबरी मशीद ट्रस्ट तयार केला जाईल. या ट्रस्टच्या वतीने 6 डिसेंबर 2025 च्या आत या बेलडांगा परिसरात दोन एकर जागेवर बाबरी मशीद उभारण्यात येणार आहे.
Bharatpur TMC MLA Humayun Kabir has announced plans to construct a new Babri Masjid in Beldanga. This comes after recent incidents in Beldanga where Hindus were reportedly attacked, and celebrations of Kartik Puja were forcibly stopped. pic.twitter.com/1XtHY8lcR6
— Tushar Kanti Ghosh (@TusharKantiBJP) December 9, 2024
मी करोडो रुपये देईन
बंगालचे मुस्लिम आपली मान वर काढून संपूर्ण देशाला दाखवून देतील की, मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथे बाबरी मशीद स्थापन झाली आहे. मी स्वतः मशिदीच्या उभारणीसाठी एक कोटी रुपये देईन. 6 डिसेंबर 2025 पर्यंत बेलडांगा येथे बाबरी मशीद स्थापनेचे काम सुरू होईल, असा दावाही हूमाहून कबीर यांनी यावेळी केला.
हुमायून कबीर वादात
हुमायून कबीर हे मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भरतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ममता बॅनर्जी सरकारच्या कार्यकाळात ते मंत्रीही राहिले आहेत. 2011 मध्ये त्यांनी टीएमसीच्या तिकिटावर रेजीनगर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. अलीकडेच हुमायून कबीर यांचे एक विधान वादात सापडले होते. त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप समर्थकांचे तुकडे करुन भागीरथी नदीत फेकून देण्याची घोषणा केली होती. मुर्शिदाबादमधील हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना बॉलीवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी, तुला कापून जमिनीत गाडून टाकू, असे प्रत्युत्तर दिले होते.