नवी दिल्ली : मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक असलेल्या तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरविण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर लोकसभेमध्ये गुरुवारी चर्चा होणार आहे.हा निर्णय लोकसभेने गेल्या आठवड्यात घेतला. त्या चर्चेत सहभागी होण्याचे काँग्रेसने मान्य केले आहे. तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी गदारोळ माजवू नये असे आवाहन संसदीय कामकाजमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.राफेल खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने लावून धरली आहे. त्या मुद्यावरून लोकसभा, राज्यसभेत विरोधकांकडून सतत आवाज उठविला जातो. त्यातून होणाऱ्या गदारोळामुळे सभागृहांचे कामकाज तहकूब करण्याची वेळ वारंवार आली आहे. तिहेरी तलाकसंदर्भातील नवे विधेयक लोकसभेत १७ डिसेंबर रोजी मांडण्यात आले. त्यातील तरतुदींनुसार आरोपी पतीस तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. हे नवे विधेयक मंजूर झाल्यास ते याआधी याच विषयावरील लोकसभेत संमत झालेल्या जुन्या विधेयकाची जागा घेईल. आधीच्या विधेयकात काही दुरुस्त्या करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.तिहेरी तलाकच्या ४३० घटनातिहेरी तलाकवर बंदी घालणारा वटहुकूम जारी झाला होता. त्याची मुदत सहा महिनेच आहे. ती संपण्याआधी संसदेच्या चालू अधिवेशनात या विषयाचे विधेयक मांडल्यानंतर ४२ दिवसांच्या आत ते मंजूर करणे अनिवार्य आहे. असे झाल्यास ते विधेयक वटहुकमाची जागा घेईल.देशात जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तिहेरी तलाक घेतल्याचे ४३० प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यातील २२९ घटना सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकसंदर्भात निकाल देण्याआधी नोंदल्या गेल्या, तर बाकीच्या २०१ घटना त्यानंतर उजेडात आल्या.
आज तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर लोकसभेत चर्चा, काँग्रेसही होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 5:43 AM