नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होणार आहे.२१ जून २0१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार आहे. योग दिनाच्या दिवशीच ‘वसंत संपात’ असतो.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘योगा अॅट होम, योगा विथ फॅमिली’ (घरच्या घरी योग, परिवारासोबत योग), असे यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य आहे. २१ जून रोजी सकाळी ७ वा. लोक या आभासी समारंभात आपापल्या घरूनच सहभागी होऊ शकतील. विदेशातील भारतीय दूतावासांकडून लोकांना डिजिटल माध्यमातून योग दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यासाठी योग संस्थांची मदत घेतली जात आहे. यंदाच्या योगदिनी लेह येथे मोठा कार्यक्रम घेण्याची तयारी आयुष मंत्रालयाने केली होती. तथापि, साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ११ डिसेंबर २0१४ रोजी घेतला होता.आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश मुख्य आकर्षण राहणार आहे. कोविड-१९ साथीमुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रमाला महत्त्व न देता लोकांकडून संपूर्ण कुटुंबासह आपापल्या घरूनच योग करून घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधानांचा संदेश सकाळी ६.३0 वा. दूरचित्रवानी वाहिन्यांवरून प्रसारित केला जाईल. त्यांच्या संदेशानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या वतीने ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ (सीवायसी) या नावाने ४५ मिनिटे योगाचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. विभिन्न वयोगट व समाजघटक लक्षात घेऊन सीवायसी प्रात्यक्षिके ठरविण्यात आली आहेत.आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, साथीच्या काळात योग अत्यंत उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. योगाच्या सरावामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मजबूत होण्यास मदत होते. त्यातून माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीच एक व्हिडिओ संदेश जारी करून लोकांना आपापल्या घरूनच योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या योग दिनाची जोरदार पूर्वतयारी सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.भारतीय दूतावासांच्या वतीने जगभरातील अनेक शहरांत आॅनलाईन कार्यक्रम होत आहेत.>रोगप्रतिकारशक्ती वाढीवर भरभारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, यंदाच्या योगदिनी व्यक्तिगत पातळीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या मुद्यास महत्त्व दिले जाणार आहे. साथीच्या काळातील गरज लक्षात घेऊन या मुद्याला महत्त्व देण्यात आले आहे.
International Yoga Day 2020: कोरोनाच्या साथीमुळे आजचा योग दिन होणार डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 3:00 AM