उद्या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:14 AM2018-07-26T02:14:06+5:302018-07-26T02:14:41+5:30

सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार

Tomorrow's largest lunar eclipse in the century | उद्या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण

उद्या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण

Next

पुणे : येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील ( २००१ ते २१०० ) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. सध्या आपल्याकडे पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने आपण या संधीला मुकतो की काय असे वाटत आहे. या वेळेस होणाऱ्या ग्रहणाचा कालावधी सुमारे चार तास ( ३ तास ५५ मिनिटे ) असल्याने हे सर्वात मोठ्या कालावधीचे ठरणार आहे व याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक चारचा तांबडा ग्रह मंगळ ही प्रतियुती मध्ये येत असून तो २००३ नंतर प्रथमच इतक्या कमी अंतरावर येत आहे.
भौतिकशास्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, २७ जुलै रोजी सूर्य - पृथ्वी - चंद्र व मंगळ ग्रह हे सर्व एकच रेषेत येत आहेत. या वेळेस खग्रास स्थितीतील तांबडा चंद्रव तेजस्वी तांबडा ग्रह मंगळ हे दोन्हीही आकाशात लक्ष वेधून घेणार आहेत. २७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे सोरास चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडातून (युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका ) हे ग्रहण पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतात यावेळी ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार २७ जुलै रोजी २३़५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या पश्चिमेकडील बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे़ खग्रास स्थिती वेळ २८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता सुरू होणार आहे. ग्रहण मध्य २८ जुलै रोजी १ वाजून ५२ मिनिटांनी होणार आहे, तर पहाटे २.४३ वाजता ग्रहणाची खग्रास स्थिती संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला सुरुवात होईल व ३.४९ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.
या खग्रास चंद्रग्रहणाच्या सर्व स्थिती (स्पर्श, संमिलन, उन्मिलन व मोक्ष) या भारतातील सर्व ठिकाणांतून दिसणार आहे, केवळ पावसाळ्याचे दिवस असल्याने ढगाळ वातावरण असेल, तर या मोठ्या खगोलीय घटनेला मुकावे लागणार आहे.
चंद्र पृथ्वी भोवती फिरताना दीर्घ वर्तुळाकार कक्षेत फेरी मारतो. वर्षभरातील दुरस्थ अंतर हे जुलै महिन्यात असते़ तसेच, जुलै महिन्यातील दुरस्थ अंतरही दिनांक २७ जुलै रोजीच आले आहे. चंद्र आकाशात आकाराने वर्षातील सर्वांत लहान आकारात दिसणार असून ग्रहण काळात पृथ्वीच्या दाट छायेतून प्रवास करताना जास्त वेळ घेणार आहे. यामुळेच हे खग्रास चंद्रग्रहण सर्वाधिक कालावधीचे असणार आहे.
२७ जुलै रोजी दुपारी ०१.२० वाजता सूर्यमालेतील चौथा गृह मंगळ सूर्याशी प्रतीयुतीमध्ये येत आहे. या दिवशी सायंकाळी सूर्य पश्चिम आकाशात मावळला की पूर्व आकाशात पौर्णिमेचा चंद्र व त्या जवळच तेजस्वी तांबडा मंगळ ग्रह दिसणार आहे. या वेळेस पृथ्वी मंगळ अंतर हे ५.७६ कोटी किमी असणार आहे.
सन २००३ च्या २७ आॅगस्ट रोजी हाच मंगळ आपल्या ६० हजार वर्षांतील सर्वांत कमी अंतरावर म्हणजेच, ५.५६ कोटी किमी अंतरावर होता. या वेळेस आकाश निरभ्र असल्यास दुर्बिणीतून निरीक्षण केले असता मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवावरील असलेला बर्फाच्छादित प्रदेश पाहायला मिळू शकतो, असे जोहरे यांनी सांगितले़

Web Title: Tomorrow's largest lunar eclipse in the century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.