जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये लष्काराच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथील राजवार परिसरात लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर याला जवानांनी कंठस्नान घातले आहे.
जम्मू-काश्मीरच्या हंदवाड्यात झालेल्या चकमकीत पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर याचा खात्मा करण्यात आला. याशिवाय, आणखी ठार करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची अद्याप ओळख पटली नाही, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, या चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या पाच जणांसह जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक जण शहीद झाला आहे. दहशतावाद्यांचा सामना करताना हौतात्म्य पत्करलेल्या पाच जणांमध्ये लष्करातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हंदवाड्यातील एका घरात दोन परदेशी दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर दहशतवादी लपलेले घर जवानांनी स्फोटकांनी उडवून दिले. या स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. याशिवाय, या भागात लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. संपूर्ण परिसर लष्कराने सील केला आहे. वाहतूक थांबवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांनी जोर धरला आहे. याशिवाय, पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे. याआधी पुलवामाच्या डांगरपोरामध्ये सुरक्षा दलांना सकाळी सहा वाजता दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले. जवानांकडून घेरले जाताच दहशतवाद्यांनी गोळीबार करत पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना कंठस्नान घालण्यात आले.