नवी दिल्ली : ब्रिटनमधून अवघ्या जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेन भारतातही हळूहळू पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची आणखी पाच जणांना लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. नव्या पाच रुग्णांसह कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची देशातील एकूण रुग्ण संख्या आता २५ वर पोहोचली आहे.
देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या सर्व रुग्णांना सेल्फ आयसोलेट करण्यात आले असून, नवीन लागण झालेल्या ५ रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. या सहा जणांपैकी ४ जणांचे नमुने पुणे आणि २ नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आढळले आहेत. ब्रिटनहून परतलेल्या १४ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकारची लागण झाल्याचे बुधवारी समोर आले होते. यापूर्वी मंगळवारी ६ जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. देशभरात सहा विभाग ठरवण्यात आले असून, विभागवार ब्रिटनहून भारतात परतलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून सुमारे ३३ हजार प्रवासी भारतात आले असून, सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे नमुने देशभरातील १० प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले असून, यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांचा समावेश आहे.