वाघाला दगड मारणं पडलं महागात, पर्यटकाला 51 हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 03:00 PM2019-04-24T15:00:42+5:302019-04-24T15:10:49+5:30
झोपलेल्या वाघाला दगड मारला म्हणून गाइडसह एका पर्यटकाला 51 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी (23 एप्रिल) ही घटना घडली आहे.
जयपूर - प्राण्यांना दगड मारण्याची अनेकांना सवय असते. वाघाला दगड मारणं एका पर्यटकाला चांगलंच महागात पडलं आहे. झोपलेल्या वाघाला दगड मारला म्हणून गाइडसह एका पर्यटकाला 51 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी (23 एप्रिल) ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणथंबोर राष्ट्रीय उद्यानामध्ये झोन-6च्या पीलीघाट गेटवर वाघ झोपला असल्याचे पर्यटक आणि त्याच्या गाइडने पाहिले. त्यावेळी पर्यटक हा कॅमेऱ्यासह जिप्सीमध्ये बसला होता. त्यानंतर जिप्सीमधून खाली उतरतून गाइडने वाघाला जागे करण्यासाठी दगड मारला. हा सर्व प्रकार तेथील थर्मल इमेज कॅमेऱ्यात कैद झाला. हा कॅमेरा वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आला आहे.
विभागीय वन अधिकारी मुकेश सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यानातील झोपलेल्या वाघाला उठवण्यासाठी दगड मारण्यात आला. पर्यटक आणि गाइडने राष्ट्रीय उद्यानातील नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उद्यान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पर्यटक आणि गाइडला 51 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचं मुकेश सैनी यांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकारानंतर गाइडच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
वाढता मानवी हस्तक्षेप सारिस्का-रणथंबोरच्या मुळावर
वाढती लोकसंख्या आणि देवीची जत्रा यामुळे सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. रणथंबोर अभयारण्यातली व्याघ्रसंख्या झपाट्याने वाढली असून तेथील वाघांना स्थलांतरित करावे लागणार आहे. मात्र, पर्यटन लॉबीच्या दबावामुळे हे स्थलांतर अडले आहे. ‘सारिस्का व रणथंबोर ही दोन्ही अभयारण्ये एकमेकांना निकट असल्यामुळे वाघांचे स्थलांतर करण्यात नैसर्गिक अडचणी नाहीत,’ अशी माहिती डेहराडून येथील ‘भारतीय वन्यजीव संस्थान’च्या प्राणी पर्यावरण आणि संवर्धन जीवशास्त्र विभागाचे प्रमुख यादवेंद्र झाला यांनी ‘लोकमत’लादिली.
हा प्रकल्प आता 6 बछड्यांसह 19 वाघांचे निवासस्थान बनला आहे. 2005 मध्ये सारिस्का अभयारण्यातून 4 वाघ नाहीसे झाल्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली होती. मात्र, त्यानंतर 2008 साली रणथंबोरमधून वाघांच्या दोन जोड्या स्थलांतरित करण्यात आल्या. आणखी दोन वर्षांनतर वाघांच्या 2 मादी येथे सोडण्यात आल्या. सध्या येथील वाघांची संख्या 19 आहे. तरीही गेल्या वर्षभरात येथे 3 वाघांचा झालेला मृत्यू ही वनाधिकाऱ्यांच्या चिंतेची बाब बनली आहे.
अरे बापरे ! 1500 किलो वजनाच्या वाघाचा सापडला सांगाडा!
केनियामध्ये एका वाघाचे जीवाश्म मिळाले आहेत. याला संशोधक वाघाची सुरुवातीची प्रजाती असल्याचे सांगत आहेत. त्यांचं मत आहे की, आफ्रिकेमध्ये सावानाच्या गवताच्या मैदानात 2.3 कोटी वर्षांपूर्वी वाघांची एक विशाल प्रजाती राहत होती. याचं वजन साधारण 1500 किलो ग्रॅम होतं. वाघांची ही प्रजाती हत्ती एवढ्या मोठ्या प्राण्यांची शिकार करत होते. ड्यूक आणि ओहायो यूनिव्हर्सिटीचे संशोधक मॅथ्यू बोर्थ्स आणि नॅन्सी स्टीवन्स यांनी वाघाच्या सांगाड्याची टेस्ट केल्यानंतर ही माहिती दिली.