परदेशी नागरिकांना लवकरच टुरिस्ट व्हिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:14 AM2021-09-16T09:14:24+5:302021-09-16T09:14:48+5:30
कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी आणि परकीय चलन मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मार्च २०२० पासून भारताने परदेशी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्याचे थांबविले आहे. भारतात दरमहा आठ ते नऊ लाख परदेशी पर्यटक येत असतात. दीड वर्षापासून ते येणे बंद झाले आहे. त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे रोजगारही त्यामुळे गेले आहेत. अन्य देशांनी पुन्हा पर्यटन व्हिसा द्यायला सुरुवात करावी, अशी भारताची अपेक्षा आहे. त्यामुळे देशातील पर्यटन कंपन्यांचे संकट कमी होईल. याबाबत केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
दोन डोस आवश्यकच
ज्या परदेशी नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहेत, त्यांनाच सुरुवातीला व्हिसा देण्याचे ठरवत आहोत, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अनेक आखाती देशांनी आता व्हिसा देण्यास सुरुवात केली असून, इतर देशांनीही व्हिसाबाबत कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केलेले नियम काहीसे शिथिल केले आहेत.