आजचा दिवस देशासाठी खूप महत्वाचा आहे. एकीकडे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. दिल्लीच्या सीमेवर सध्या 60000 हून अधिक ट्रॅक्टर उभे ठाकले आहेत. परंतू, सिंघू आणि तिक्री बॉर्डरवर पोलिसांनी रातोरात बॅरिकेड टाकून रस्ते अडविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे दोन्ही सीमांवरील बॅरिकेड हटवून शेतकऱ्य़ांनी दिल्लीकडे कूच केले आहे.
दिल्लीला जाण्यासाठी केएमपी-केजीपीवर जवळपास 25 ते 30 किमीच्या रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रवेश देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सिंघु बॉर्डर उघडली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला रवाना होणार आहेत. मात्र, काही ठिकाणी बॅरिकेड्स असल्याने ते हटवून काही शेतकरी पुढे जाऊ लागले आहेत.
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरना डिझेल मिळू नये म्हणून उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये पेट्रोल पंपांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये ट्रॅक्टर, कॅन, बाटल्यांमध्ये डिझेल न देण्याचे आदेश आहेत.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर 62 किलोमीटर, तिक्री बॉर्डरवर 63 किलोमीटर आणि गाझीपूर बॉर्डरवर 46 किलोमीटर ट्रॅक्टर परेड पोलिसांच्या बंदोबस्तात काढली जाणार आहे. यामध्ये एक ट्रॅक्टर दुसऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणार नाही. असे केल्यास त्या ट्रॅक्टरला परेडमधून बाहेर काढले जाणार आहे, असे शेतकरी नेत्यांनी ठरविले आहे. ट्रॅक्टर परेडवेळी सामान्य लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक 100 मीटरवर व्हॉलिंटिअर तैनात करण्यात येणार आहेत. परेडच्या सुरुवातीला ज्येष्ठ शेतकरी आणि नेते असणार आहेत. त्यानंतर तरुण शेतकरी मोर्चा सांभाळणार आहेत. ही परेड रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. तसेच कोणीही वादग्रस्त घोषणा किंवा बॅनरबाजी करणार नाही. तसेच हत्यारे किंवा दारू घेऊन कोणीही परेडमध्ये येणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.