कर्नूल : चालकाचे नियंत्रण सुटल्याने यात्रेकरुंना घेऊन भरधाव वेगाने जाणारी मिनीबस ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एका लहान मुलासह १४ जणांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशच्या कर्नूलजवळ राष्ट्रीय महामार्गावर भल्या पहाटे ही घटना घडली. अपघातात केवळ ४ लहान मुले बचावली असून त्यापैकी दाेघांची प्रकृती गंभीर आहे.कर्नूलजवळ वेलदर्ती गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण १८ यात्रेकरू हाेते. बस सर्वप्रथम महामार्गावरील दुभाजकाला धडकली. त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण हाेता की संपूर्ण बसच्या ठिकऱ्याच उडाल्या. आतमधील प्रवाशांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. चालकाचा डाेळा लागला की टायर फुटल्याने ही घटना घडली, याबाबत तपास सुरू आहे.बसमधील यात्रेकरू चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ली येथून राजस्थानातील अजमेर येथे जात हाेते. अजमेरला जाण्यासाठी तेथून थेट रेल्वे नसल्यामुळे या भागातील अनेक जण बसनेच अजमेरला जातात. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमाेहन रेड्डी यांनीही शाेक व्यक्त केला असून जखमी मुलांवर सर्वताेपरी उपचारांच्या सूचना दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)
यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात; १४ ठार, केवळ ४ मुले बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 7:43 AM