Video: देव तारी त्याला कोण मारी; अंगावरुन ट्रेन जाऊनही चिमुकली सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 05:10 PM2018-11-20T17:10:10+5:302018-11-20T17:13:48+5:30
संपूर्ण ट्रेन अंगावरुन जाऊनही साधं खरचटलंदेखील नाही
Next
मथुरा: उत्तर प्रदेशातल्या मथुरा रेल्वे जंक्शनवर आज एक अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या कुशीतील एक वर्ष वयाची चिमुरडी रेल्वे रुळांजवळ पडली. ट्रेन आणि फलाट यांच्यामध्ये असलेल्या जागेतून ही मुलगी रुळांजवळ पडली होती. तेवढ्यात ट्रेन सुरू झाली. मात्र या मुलीला साधं खरचटलंही नाही. ती अगदी सुरक्षित होती. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार पाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
#WATCH: One-year-old girl escapes unhurt after a train runs over her at Mathura Railway station. pic.twitter.com/a3lleLhliE
— ANI UP (@ANINewsUP) November 20, 2018
मथुरा रेल्वे जंक्शनवर आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. एका महिला प्रवाशाच्या कुशीत असलेली एक वर्ष वयाची चिमुरडी रुळांजवळ पडली. त्यामुळे अनेकांच्या काळजात काही वेळासाठी धस्स झालं. ट्रेन आणि फलाट यांच्यामध्ये असलेल्या जागेतून ही चिमुरडी रुळांजवळ पडली. तिला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याआधीच ट्रेन सुरू झाली. मात्र देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय यावेळी आला. संपूर्ण ट्रेन अंगावरुन जाऊनही चिमुरडीला साधं खरचटलंही नाही.
जवळपास 8 ते 9 फूटांवरुन पडून आणि संपूर्ण ट्रेन अंगावरुन जाऊनही चिमुरडीला इजा झाली नाही. या मुलीचं नाव साहिबा असं आहे. साहिबाचे आई-वडिल तिला घेऊन मथुरा रेल्वे जंक्शनवर आले होते. यावेळी साहिबा तिच्या आईच्या कुशीत होती. मात्र फलाटावरील गर्दी वाढल्यानं धक्काबुक्की झाली आणि साहिबा आईच्या कुशीतून थेट फलाट आणि ट्रेन यांच्यामध्ये असलेल्या जागेतून थेट रुळांजवळ पडली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात ट्रेन सुरू झाल्यानं अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र चिमुरडी सुरक्षित असल्याचं पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला.