अमृतसर : आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर लोकांनी रेल्वेवर दगड फेकायला सुरुवात केल्याने आपण रेल्वे थांबविली नाही, असा दावा अमृतसर रेल्वेच्या चालकाने केला आहे. तथापि, चालकाचे म्हणणे खोटे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघातात ६२ जण मृत्युमुखी पडले आहेत.या चालकाने हॉर्न वाजवला नाही वा वेगही कमी केला नाही, असे स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे. रेल्वेवर आम्ही दगडफेक केली, हा चालकाचा दावा तद्दन खोटा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक चिरडले गेल्यानंतर आणि रेल्वेचा वेग खूपच असल्याने लोकांनी दगडफेक केली, असे म्हणणेच चुकीचे आहे. आम्ही त्या अपघाताने गोंधळून गेलो होतो. आमच्या नातेवाईकांना व मित्रांना शोधत होतो. असे असताना आमच्यावर दगडफेकीचा आरोप करणेच अयोग्य आहे, असे त्या लोकांनी म्हटले आहे.या अपघातास रेल्वेचालक वा प्रशासन जबाबदार वा दोषी नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटले असल्याबद्दल पंजाबचे मंत्री नवज्योत सिद्धू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, रेल्वेच्या हद्दीत अपघात झाला. रेल्वेच्या चालकाने लोकांच्या अंगावर रेल्वे घातली. त्यामुळेच इतके लोक मरण पावले. तरीही चौकशी होण्याच्या आधीच चालकाला क्लीन चीट देणे वा आम्ही दोषी नाही, असे मंत्र्यांनी जाहीर करणे चुकीचे आहे.(वृत्तसंस्था)>आयोजक झाला बेपत्तारावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाने केले होते. तिथे नवज्योत सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. हा अपघात होताच, नगरसेवकाचा मुलगा तिथून धावत सुटला आणि कारमध्ये बसून निघून गेला, असे दर्शविणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या अपघातानंतर केवळ नगरसेवकाचा मुलगाच नव्हेतर त्याचे आई-वडील व सर्व नातेवाईक घर सोडून निघून गेल्याचे सांगण्यात येते. चिडलेल्या लोकांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला आणि दगडफेक करून घराच्या काचाही फोडल्या.
रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 5:04 AM