दोन 'वर्ल्ड क्लास' रेल्वेगाड्यांमुळे प्रवासाचा वेळ 20 टक्क्यांनी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:05 AM2018-01-24T01:05:26+5:302018-01-24T06:00:16+5:30
रेल्वेकडून सध्या चालविल्या जात असलेल्या रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक वेगाने धावू शकणा-या व जागतिक दर्जाचे सारे निकष राखून बनविण्यात येणा-या दोन नव्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी
चेन्नई : रेल्वेकडून सध्या चालविल्या जात असलेल्या रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक वेगाने धावू शकणा-या व जागतिक दर्जाचे सारे निकष राखून बनविण्यात येणा-या दोन नव्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी होईल.
चेन्नई येथील रेल्वेच्या फॅक्टरीमध्ये या दोन ट्रेनच्या डब्यांचा आराखडा बनविण्यात आला आहे. याचे सर्व डबे वातानुकूलित असतील. त्यांना ट्रेन १८ व ट्रेन २० अशी नावे देण्यात आली आहेत. ट्रेन १८ मध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. या गाडीच्या १६ डब्यांची निर्मिती जूनपर्यंत पूर्ण होईल.
या डब्यांमध्ये वाय-फाय, जीएसपीवर आधारित माहिती, इन्फोटेनमेन्ट, एलईडी लाइटचा वापर केलेले इंटेरिअर अशा सुविधा या डब्यांमध्ये असतील. शताब्दी ट्रेनना ज्याप्रमाणे एरोडायनॅमिक नोज आहे, तशाच प्रकारे ट्रेन १८चाही आराखडा बनविण्यात आला आहे. दोन शहरांतर्गत जलदगतीने प्रवास करण्यासाठी या ट्रेनचा वापर होईल.
ट्रेन २० ही दुसरी गाडी २०२० साली सुरु करण्यात येईल. या गाडीतही जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. राजधानी एक्स्प्रेसधील सर्व सुविधा ट्रेन २०मध्येही असतील. राजधानी एक्स्प्रेसची जागा ट्रेन २० भविष्यात घेईल.
दिल्ली-हावडा प्रवासाची वेळ साडेतीन तासांनी घटेल-
नवीन तंत्रज्ञानाने बनविण्यात येणा-या या गाड्यांचा वेग अधिक असेल. त्या दिल्ली-हावडा दरम्यानचे १४४० किमीचे अंतर इतर गाड्यांहून साडेतीन तास आधीच पूर्ण करू शकतील. राजधानी व शताब्दी एक्स्प्रेस गाड्या ताशी १५० किमी वेगाने धावू शकतात, पण त्यांचा सरासरी वेग ताशी ९० किमी राहतो. नव्या रेल्वेगाड्या दरताशी १३० किमी वेगाने धावू शकणार असून, त्यांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी १६० किमीपर्यंत वाढविली जाऊ शकते. (प्रतिकात्मक छायाचित्र - Source: Wikimedia Commons)