आदिवासी पाड्यांवर नेत्यांच्या गाड्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:13 AM2018-12-03T04:13:29+5:302018-12-03T04:13:42+5:30
विधानसभा निवडणुकीत जातींचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार असून, एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी राजकीय नेते जातवार प्रचारावर भर देताना दिसत आहेत.
- धनाजी कांबळे
हैदराबाद : विधानसभा निवडणुकीत जातींचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार असून, एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी राजकीय नेते जातवार प्रचारावर भर देताना दिसत आहेत. विशेषत: आदिवासी बहुल भागांतील मतांवर डोळा ठेवून नेत्यांच्या गाड्या आदिवासी पाड्यांवर लवाजम्यासह येत आहेत.
एरव्ही अभयारण्यात पर्यटकांची गर्दी असते. मात्र, सध्या कवाल अभयारण्यात नेत्यांची गर्दी आहे. हैदराबादपासून २५० किलोमीटर अंतरावरील अभयारण्याच्या परिसरात आदिवासींची संख्या मोठी आहे. हा भाग खानापूर मतदारसंघात येतो. येथे १.८३ लाख नागरिक मतदार आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात आदिवासींची संख्या आहे. त्यामुळेच इकडे सध्या नेते प्रचारफेऱ्या काढत आहेत.
हा मतदारसंघ देखील एसटीसाठी राखीव आहे. ८९३ किलोमीटर परिसरात हा भाग पसरला असून, याच भागात सागवानी वृक्ष आढळतात. तसेच येथील जंगलात वाघ, चित्ता, सांबर, नीलगाय यांच्यासह पशूपक्षी देखील आहेत. जंगल परिसरात प्रचार करणे ही साधी गोष्ट नसल्याचे येथील उमेदवार थोडसम नागोराव यांनी सांगितले. लंबाडा समाजाचे लोक जंगलातून बाहेर येतजात असतात. मात्र, गोंड समाजाचे लोक जंगलातून बाहेर येत नाहीत. त्यामुळे गाडीतून उतरून छोट्या छोट्या पाड्यांवर जावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत. डोंगापल्ली येथील आदिवासी टीआरएस सरकारवर नाराज असून, ते आम्हालाच मदत करतील, असे दावे सर्वच उमेदवार करीत आहेत. टीआरएस सरकारने आदिवासींना ४००० रुपये प्रतिएकरला अनुदान दिले जाईल, असे म्हटले होते. मात्र, आजही आमच्या नावावर जमिनी झालेल्या नाहीत, असे रेखा नायक या आदिवासी महिलेने सांगितले. शेतकºयांप्रमाणे आम्ही कसत असलेली जमीन आमच्या नावावर झाल्यास आम्हाला आनंद वाटेल, असेही त्या म्हणाल्या.
जमिनीचे प्रश्न सुटलेले नाहीत, मात्र टीआरएस किमान विकास करीत आहे, असे मल्याला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माणिक राव यांनी म्हटले. या भागात पहिल्यांदाच मतदान केंद्र असणार आहे. तसेच आम्हाला गॅस सिलिंडर मिळाले, पण त्यात गॅस भरण्यासाठी आमच्याकडे इतके पैसेच नाहीत, असे एका महिलेने सांगितले. तेलंगणात २६ लाख आदिवासी समाज आहे. खानापूर मतदारसंघातून दोन अपक्ष आणि १० पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. टीआरएसकडून आजमिरा रेखा, भाजपकडून अशोक सटला, रमेश राठोड हे काँग्रेसकडून, तर अजमेरा नायक बीएसपीकडून आणि थोडसम राव हे सीपीआयकडून निवडणूक लढवीत आहेत.
> बळीचा बकरा बनवला
तेलगु देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एनटीआर यांची नात असलेल्या नंदामुरी सुहासिनी यांना बळीचा बकरा बनविले आहे, असा आरोप के. टी. रामाराव यांनी केला. कुकटपल्लीमध्ये त्यांनी हा आरोप केला. चंद्राबाबूंनी आपले पुत्र एन. लोकेश यांना मंत्रीपदी बसवले त्यावरून त्यांचे नंदामुरी प्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट होत असून, त्यांना खरेच नंदामुरी यांच्या कुटुंंबाबद्दल प्रेम असते, तर त्यांनी सुहासिनी यांना मंत्री केले असते. आता मात्र त्यांनी सुहासिनी यांना उमेदवारी देऊन त्यांना बळीचा बकरा बनवले आहे, असेही रामाराव म्हणाले.