रांची – झारखंडच्या देवघरमधील त्रिकुट रोपवे ट्रॉलीत अडकलेल्या २९ जणांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. हे सर्व लोक रविवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून १ हजार फूट उंचीवर झुलत्या ट्रॉलीत अडकले आहेत. सर्व लोकांचा जीव वाचवण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली आहे. घटनास्थळी लष्कराचे दोन MI 17 हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. परंतु रेस्क्यूमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आतापर्यंत बचाव पथकाने १९ जणांना या संकटातून यशस्वीपणे बाहेर काढले आहे. आताही २९ जण अडकले आहेत. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा रेस्क्यू व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ एका लहान मुलीला अनेक फूट उंचीवरून हवेत लटकणाऱ्या ट्रॉलीच्या दोरखंडाच्या सहाय्याने खाली आणलं जात आहे. या मुलीचा व्हिडीओ पाहिला तर याठिकाणी अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी किती आव्हानात्मक आहे याचा अंदाज घेता येतो.
आयटीबीपी, लष्कर आणि एनडीआरएफच्या संयुक्त विद्यमानाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत रेस्क्यू केलेल्या १९ जणांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या मुलांना बचाव कॅम्पमध्ये आणून खाणे-पिणे दिले जात आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, युद्धस्तरावर बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान लोकांना सुखरूप वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या दुर्घटनेवर सरकारचं लक्ष आहे.
‘रामनवमी’च्या दिवशी घडला अपघात
देवघर जिल्ह्यातील मोहनपूर येथे प्रखंड त्रिकुट पर्वतावर झारखंडचं सर्वात उंच रोपवे आहे. रोपवेनं पर्यटकांना डोंगराच्या टोकावर नेण्याचं काम केले जाते. याठिकाणी घनदाट जंगलात महादेव मंदिर आणि ऋषी दयानंद आश्रम आहे. रामनवमीच्या उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी पोहचले होते. रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारात अचानक तांत्रिक बिघाडामुळे रोपवे बंद पडला.
कसा झाला अपघात?
पर्यटकांच्या माहितीनुसार, रोपवे सुरू असताना वरून खाली येणाऱ्या ट्रॉलीची धडक खालून वर जाणाऱ्या ट्रॉलीला दिली. त्यानंतर इतर ट्रॉली जागेवरून निसटल्या तेव्हा ही दुर्घटना आहे. रोपवे तारांच्या विविध भागात जवळपास १२ ट्रॉली अडकल्या आहेत. काही ट्रॉलीतून अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली. मात्र खूप उंचावर असल्याने अद्याप याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम बोलवण्यात आली. मात्र उंची जास्त असल्याने त्यांनाही रेस्क्यू करताना अडथळा निर्माण झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले.