पणजी: पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसने(टीएमसी) गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी गोवा विधानसभेत तृणमूल आपले उमेदवार उतरवणार आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी शनिवारी माहिती दिली. सध्या डेरेक ओब्रायन आणि प्रसून बॅनर्जी गोव्यात तळ ठोकून आहेत.
गोव्यात काँग्रेसला खिंडार ?पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणुका आहेत. यातच आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. ते आज यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा करू शकतात. दरम्यान, या आठवड्यात गोव्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक समित्यांमध्ये फेलेरो यांना समन्वय समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे. यामुळे आता काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात.
माध्यमांनी याबाबत त्यांना विचारले असता, लुईझिन्हो म्हणाले की, 'मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या मी यावर खूप विचार करत आहे. आता एवढंच सांगितले की, गोव्याची जनता चिंतेत आहे. या सरकारविरोधात कुणीतरी पुढे यायला हवं. माझा निर्णय मी योग्य वेळी सांगेल,' असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम बॉर्डरवर 'महाजाम', वाहनांच्या लांबच लांब रांगा
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लुईझिन्हो यांच्या या हालचालींवर टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांच्याशी गेल्या गुरुवारी चर्चा झालीये. परंतु अद्याप लुईझिन्हो फालेरो किंवा तृणमूल काँग्रेसने या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गोवा हे एक छोटे राज्य असले तरी महत्वाचे असल्यामुळे अनेक पक्ष या निवडणुकीला गांभीर्याने घेत आहेत.
गोवा निवडणुकांवर आपचा डोळाआम आदमी पक्षानेही गोव्याच्या निवडणुकीसाठी तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर आपने राज्यात आपले कार्य सुरू केले आहे.