रेल्वेमधील ‘टीटीई’ आता भिंगाने तिकीट तपासणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 05:11 AM2020-05-31T05:11:55+5:302020-05-31T05:12:09+5:30
प्रवाशाचे तिकीट दूरवरून पाहूनही सहज तपासता यावे यासाठी त्यांना भिंग देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात त्यांच्या गाड्यांमधील तिकीट तपासनीस (टीटीई) आता प्रवाशाचे तिकीट आपल्या हातात घेऊन न तपासता ते प्रवाशाच्या हातात असताना दुरूनच भिंगाने तपासणार आहेत!
गेल्या २४ मार्च रोजी देशभरातील सर्व प्रवासी वाहतूक बंद केल्यानंतर रेल्वे येत्या सोमवारपासून (१ जून) विविध महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांच्या १०० जोड्या पुन्हा नियमितपणे चालविणे सुरू करणार आहे. या गाड्यांमध्ये काम करणाºया ‘टीटीई’नी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर मार्गदर्शिका रेल्वे प्रशासनाने जारी केली आहे. यानुसार गाड्यांमधील ‘टीटीई’ना काळा कोट व टायऐवजी हातात ग्लोव्हज, तोंडाला मास्क व अंगावर ‘पीपीई’ आवरण घालावे लागणार आहे.
प्रवाशाचे तिकीट दूरवरून पाहूनही सहज तपासता यावे यासाठी त्यांना भिंग देण्यात येणार आहे. गाडीला सर्व ‘टीटीई’ या सर्व सुरक्षा साधनांचा खरंच वापर करतात की नाही याची अचानक तपासणी केली जाईल, असेही रेल्वेने म्हटले आहे. ड्यूटीवर रुजू होण्यापूर्वी प्रत्येकाचे ‘थर्मल स्क्रीनिंग’ केले जाईल व त्यात त्यांना ताप असल्याचे दिसल्यास त्यांना ड्यूटीवर रुजू होऊ देणार नाही. शक्यतो प्रवाशाच्या तिकिटांची आधी तपासणी करून मगच त्यांना गाडीत बसू द्यावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. ‘टीटीई’नी नेहमी हाताळल्या जाणाºया वस्तूंची स्वच्छता राखावी आणि साबण तसेच सॅनिटायझरने हात वरचेवर धुवावेत, अशाही त्यांना सूचना दिल्या आहेत.