नवी दिल्ली - बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांनी केलेलं एक ट्विट ट्विटरकडून डिलीट करण्यात आलं आहे. सुशील कुमार मोदी यांनी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप करणारं ट्विट केलं होतं. तसेच एक फोन नंबरही शेअर केला होता. मोदी यांचं ट्विट ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग करणारं असल्याने ट्विटरकडून ते डिलीट करण्यात आलं आहे.
रांचीत तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद सतत एनडीए सरकार पाडण्याचा कट करत आहेत. आमदारांशी मोबाईलद्वारे संपर्क साधत आहेत असा आरोप सुशील कुमार मोदी यांनी केला आहे. लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्रिपदाचं आमिष दाखवत आहेत असं ही म्हटलं आहे. जेव्हा त्यांनी संबंधित मोबाईल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला असं देखील म्हटलं आहे.
लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याचा कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही असं सुशील कुमार मोदींनी म्हटलं आहे. सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करताना कॉलचा उल्लेख केला. त्यातच त्यांनी एक मोबाईल नंबरही ट्विटमध्ये केला होता. ट्विटमध्ये मोबाईल नंबर देणं म्हणजेच एखाद्या व्यक्तीची खासगी माहिती देणं हे ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे ट्विटरने हे ट्विट डिलीट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे ट्विट केलं आहे.
काय आहे या ऑडिओ क्लीपमध्ये?
सुशील मोदी यांच्याकडून ऑडिओ क्लीप प्रसिद्ध करण्यात आली आहे, यात लालू प्रसाद यादव भाजपाच्या आमदाराला सांगत आहेत की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी गैरहजर राहावं, कोरोना झालाय असं पक्षाला सांग, याला उत्तर देताना भाजपा आमदाराने मी पक्षात असल्याने मला अडचणीचे ठरेल. तर लालू प्रसाद यादव आमदाराला महाआघाडीसोबत आल्यास मंत्रिपद देऊ असं आश्वासन देत असल्याचं ऐकायला मिळत आहे.
लालू प्रसाद यादव यांनी ज्या भाजपा आमदाराला फोन केला, त्या लल्लन पासवान यांचा दावा आहे की, जेव्हा फोन आला तेव्हा मी सुशील मोदी यांच्यासोबत होतो, त्यावेळी पीएने लालू यादव यांचा फोन आल्याचा निरोप दिला, जेलमधून फोन आल्याने सुरुवातीला धक्का बसला, परंतु त्यानंतर माझं आणि लालूजींच बोलणे झाले. ही ऑडिओ क्लीप प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आमदार नीरज सिंह यांनी लालू यादव यांना रांचीहून तिहार जेलमध्ये रवानगी केली पाहिजे अशी मागणी केली, तर दुसरीकडे आरजेडीकडून सुशील मोदींचे आरोप फेटाळून लावले आहेत.