श्रीनगर- कठुआ प्रकरणी जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला. जम्मू-काश्मीर सरकारमधील या दोन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडून सडकून टीका झाली. इतकंच नाही, तर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही दोन नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचं समर्थन करणाऱ्या रॅलीत सहभागी झाल्याचा आरोप या दोन मंत्र्यावर करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील भाजपाचे प्रमुख सत शर्मा यांनी लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मू-काश्मीर सरकारमध्ये लाल सिंह वनमंत्री आहेत तर गंगा उद्योग आणि वाणिज्य विभागाचे मंत्री आहेत. कठुआ सामूहित बलात्कार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया न दिल्याने काँग्रेससह सर्वसामान्यांकडून मोदींवर टीका झाली. गुरूवारी रात्री दिल्लीच्या इंडिया गेटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॅण्डल मार्च काढण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाच्या उद्घाटन स्थळी बोलताना मोदींनी कठुआ-उनाव प्रकरणावर वक्तव्य केलं.
देशभरातील कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये घडणाऱ्या अशा घटना मानवी संवेदनांना हादरविणाऱ्या आहेत. या दोन्ही घटनांमधील कुठलाही आरोपी सुटणार नाही, न्याय होणार आणि पूर्ण न्याय होणार, याचा विश्वास तुम्हाला द्यायचा आहे. आपल्या समाजातील अंतर्गत वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र मिळून काम करावं लागेल, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.