भाजपचे दोन आमदार संपर्कात; कमलनाथ सरकारमधील मंत्र्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 04:37 PM2020-03-19T16:37:00+5:302020-03-19T16:38:19+5:30
आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आम्हाला पूर्ण खात्री आहे की न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल, असंही कमलनाथ यांनी नमूद केले.
नवी दिल्ली - मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. त्यांच्या षडयंत्राचा लवकरच अंत होणार असल्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे. तर भाजपचे दोन आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा कमलनाथ सरकारमधील मंत्री पी.सी. शर्मा यांनी केला आहे.
भाजपच्या दोन आमदारांसह इतर नेतेही आपल्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी कमलनाथ बंगळुरू येथे जाऊ शकतात, अशी माहिती शर्मा यांनी दिली. भोपाळमध्ये बुधवारी झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत बंगळुरू येथे घडलेल्या घडामोडींवर नाराजीचा प्रस्ताव पास करण्यात आला. तसेच बंदी करण्यात आलेल्या आमदारांना भेटू न देणे लोकशाही विरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी बंगळुरू येथे गेलेल्या दिग्विजय सिंह यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला होता. कर्नाटक पोलिसांनी आमदारांना भेटण्यास नकार दिला होता. तसेच दिग्विजय सिंह यांना वाईट वागणूक देण्यात आल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. यावेळी आमदारांनी सर्वसंमतीने निंदा प्रस्ताव मान्य केला. तसेच कर्नाटक काँग्रेसकडून मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आम्हाला पूर्ण खात्री आहे की न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल, असंही कमलनाथ यांनी नमूद केले.