कोरोनाच्या धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिअंटने भारतात प्रवेश केला आहे. कर्नाटकातील दोन जणांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे. हे दोघेही आफ्रिकेहून परतले होते. त्यांचे वय ६६ आणि ४४ वर्ष आहे. ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या या लोकांमध्ये नेमकी कशी लक्षणे आहेत? असे विचारले असता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, ओमायक्रॉनशी संबंधित सर्व प्रकरणांची लक्षणे आतापर्यंत सामान्य आहेत. देशात किंवा जगात अशा सर्व प्रकरणांमध्ये कोणतीही धोकादायक लक्षणे आढळून आलेली नाहीत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे, यासंदर्भात अद्याप अभ्यास केला जात आहे. तसेच, ज्या लोकांत ओमायक्रॉन व्हेरिअंट आढळून आला, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटली असून, प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले जात आहे. (Omicron Symptoms)
लव अग्रवाल म्हणाले, जे लोक 'जोखमी' असलेल्या देशांतून येत आहेत, त्यांना विमानतळावर RTPCR टेस्ट करणे आवश्यक आहे. जर ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यावर क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल अंतर्गत उपचार केले जातील. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. याच बरोबर, सुमारे 29 देशांमध्ये ओमायक्रॉनची 373 प्रकरणे आढळून आली आहेत, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले, कोविड-19 लसीकरण करणे ही काळाची गरज आहे. त्याला उशीर करणे योग्य ठरणार नाही. ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालयाने स्थापन केलेल्या 37 प्रयोगशाळांच्या INSACOG च्या जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे कर्नाटकात आतापर्यंत ओमायक्रॉनची लागन झालेले दोन रुग्ण आढलून आले आहेत. मात्र, घाबरण्याचे कारण नाही. पण जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. कृपया कोरोना नियमांचे पालन करा.