चंदीगड : गेल्या काही दिवासांपूर्वी आम आदमी पक्षातून (आप) भाजपामध्ये गेलेल्या चंदीगडमधील दोन नगरसेविकांची शनिवारी घरवापसी झाली आहे. गुरचरण काला यांच्यासह आणि पूनम देवी, नेहा मूसावत या दोन नगरसेविकांनी 18 फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, या तिघांपैकी पूनम देवी आणि नेहा मूसावत यांनी पुन्हा आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
चंदीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते आणि पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही देण्यात आल्या होत्या. या दोन नगरसेविकांच्या घरवापसीमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक एकत्र आल्याने बहुमतात आलेला भाजपा आता चंदीगड महापालिकेत अल्पमतात आला आहे.
या तीन नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे महापालिकेत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष कमकुवत झाले होते. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची संख्या 20 वरून 17 वर आली होती. दरम्यान, महापौर निवडणुकीच्या वेळी भाजपाचा महापौर विजयी झाल्याचे घोषित करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना मोठा धक्का देत हा निर्णय पालटला होता. यानंतर पहिल्यांदा इंडिया आघाडीचा महापौर झाला. मात्र आम आदमी पक्षचे नगरसेवक सोबत आल्याने त्यावेळी भाजपाला उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवता आला होता.
कोर्टाने रिटर्निंग अधिकाऱ्याला फटकारले होतेदरम्यान, 30 जानेवारीला चंदीगडमध्ये महापौरपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती आणि मतपत्रिका सील केल्याचा आरोपही केला होता. हा लोकशाहीचा खून आहे, असे म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महापौर निवडणुकीसाठी असलेले रिटर्निंग अधिकारी अनिल मासिल यांना फटकारले होते. रिटर्निंग अधिकाऱ्यांनी मतपत्रिका खराब केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीची हत्या होत आहे, आम्हाला आश्चर्य वाटते, असे सरन्यायाधीशांनी म्हटले होते.