श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या बाजूनं दोन ड्रोन आल्याचं वृत्त एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. पाकिस्तानकडून आलेल्या दोन्ही ड्रोन्सनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ड्रोनच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. या घटनेनंतर जवानांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.जम्मू-काश्मीरमध्ये काल पहाटे सुरक्षा दलांनी नगरोटामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. एका ट्रकमधून जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा दलांना मिळाली होती. नगरोटामध्ये एका टोल नाक्याजवळ ट्रक थांबवण्याचा प्रयत्न झाल्यावर चकमक सुरू झाली. यामध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या दहशतवाद्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सांबा गाठलं होतं. तिथून त्यांना एक जण काश्मीरला नेणार होता.बापरे! २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते नगरोटामधील 4 दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवादी आगामी जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी हिंसक कारवाया करू शकतात, असं जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सोमवारीच म्हटलं होतं. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न सीमेपलीकडून केले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.