इसिसचे दोन दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये घुसले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:40 AM2020-01-06T04:40:22+5:302020-01-06T04:40:28+5:30
उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे,
बस्ती (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. अब्दुल समद आणि इलियास हे वाँटेड दहशतवादी उत्तर प्रदेशातून नेपाळमध्ये पलायन करू शकतात हे समोर आले, असे महा निरीक्षक (बस्ती रेंज) आशुतोष कुमार यांनी सांगितले. गुप्तचरांकडून या दहशतवाद्यांबद्दल समजताच अति दक्षतेचा इशारा दिला गेला, असे ते म्हणाले. या दोन दहशतवाद्यांना ओळखता यावे म्हणून त्यांची छायाचित्रेही सर्वत्र दिली गेल्याचे ते म्हणाले.
ते दोघे कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत हे मला माहिती नसल्याचे कुमार म्हणाले. यापूर्वी हे दोघे पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत दिसले होते व त्यांचा इसिसशी संबंध असल्याचा संशय असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
भारत-नेपाळची सीमा १,७५१ किलोमीटर असून अनेक ठिकाणांहून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी यापूर्वी भारतात शिरकाव केलेला आहे. व अनेकांना भारतीय सीमा संरक्षण करणाºया यंत्रणांनी पकडलेही होते. उत्तर प्रदेशची ५९९.३ किलोमीटरची नेपाळला लागून खुली सीमा आहे व ती पिलिभीत, लखीमपूर, खेरी, बहारीच, श्रावस्ती, बलरामपूर, लखीमपूर खेरी आणि महाराजगंज या जिल्ह्यांना लागून आहे. (वृत्तसंस्था)