नवी दिल्ली : आश्चर्यकारक अशा घडामोडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) हलवले. मोदी यांचे गुजरातपासून अत्यंत विश्वासू समजले जाणारे व अतिरिक्त सचिवपद भूषवत असलेले ए. के . शर्मा यांना मध्यम आणि लघु व सुक्ष्म उद्योग (एमएसएमई) विभागात फारसे महत्व नसलेल्या सचिव पदावर हलवले. आणखी एक अतिरिक्त सचिव पदावरील तरूण बजाज यांच्याकडे आर्थिक कामकाज सचिवपद दिले आहे. रविवारी मोदी यांनी सचिव आणि अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ३५ बदल केले. ते करताना त्यांनी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना आणखी तीन महिन्यांसाठी त्याच पदावर कायम राखण्याचा निर्णय घेतला.सुदान या येत्या ३० एप्रिल रोजी वयोमानानुसार निवृत्त होणार होत्या. कोरोना विषाणूविरुद्धच्या (कोविड−१९) लढाईसाठी सुदान यांना त्या पदावर कायम राखले जाईल, अशी जोरदार चर्चाही होती. प्रीती सुदान यांचा अपवाद वगळता सेवानिवृत्त होणा-या इतर कोणत्याही सचिवाला मुदतवाढ दिली गेलेली नाही. भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) गुजरात केडरचे अतनू चक्रवर्ती यांना आर्थिक कामकाज मंत्रालयात मुदतवाढ मिळेल अशी जोरदार चर्चा होती. परंतु, तसे काही झाले नाही. दुसरी आश्चर्यकारक घडामोड म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयात अमित खरे यांना सचिव म्हणून परत आणणे. खरे हे या आधी माहिती व प्रसारण मंत्रालयात होते व त्यांना सचिव (उच्च शिक्षण) म्हणून पाठवले गेले होते.माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना अमित खरे परत मंत्रालयात हवे होते, असे कळते. त्यामुळे खरे यांना अतिरिक्त जबाबदारी दिलीअसली तरी ती तीन महिन्यांची आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की तीन महिन्यांनंतर आणखी एकदा खांदेपालट होणार. गुजरात केडरच्या अनिता खारवाल या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या सचिव असतील. सध्या त्या सीबीएसईच्या सचिव होत्या. अपूर्वा चंद्रा हे संरक्षण मंत्रालयात (संपादन) अतिरिक्त सचिव होते. त्यांना त्याच मंत्रालयात विशेष सचिवपदी बढती मिळाली असून त्यांच्याकडे पूर्वीचीच जबाबदारी आहे. अपूर्वा चंद्रा हे भारतीय प्रशासन सेवेतीलमहाराष्ट्र केडरच्या १९८८ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. हिमाचल प्रदेश केडरचे तरुण कपूर हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात नवे सचिव असतील. सध्याचे सचिव एम. एम. कु ट्टी हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत.<नितीन गडकरींच्या मंत्रालयात नवे सचिवरस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयातही नवे सचिव येतील. अरामाने गिरीधर हे संजीव रंजन यांची जागा घेतील. अरामाने हे मंत्रिमंडळ सचिवालयात अतिरिक्त सचिव होते. अशा प्रकारे नितीन गडकरी यांना दोन नवे सचिव मिळतील व दोन्ही मंत्रालये त्यांच्याचकडे आहेत.
CoronaVirus: पंतप्रधान कार्यालयातून दोन अधिकारी हलवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 5:51 AM