नवी दिल्ली -भारतातकोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज नोएडामध्ये 2 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 134 वर पोहोचला आहे. येथील गौतमबुद्ध नगरमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी अनुराग भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार नोएडाच्या सेक्टर 78 आणि 100 मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
भार्गव म्हणाले, येथे दोन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही फ्रान्समधून भारतात आले आहेत. या दोघांनाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
या दोन कोरोना बाधितांनंतर आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 134 वर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या वतीने या जीवघेण्यात आजारापासून जनतेचे संरक्षण करण्यासठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण जगभरात या आजाराने तब्बल 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे. तर भारतात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाबाधित 13 जण बरे झाले आहेत. भारतातील 12 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत कोरोनाग्रस्तांची संख्या 134 वर पोहोचली आहे.
मुंबईत महाराष्ट्रातील पहिला बळी -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेला 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. हिंदुजामधील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते, या रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. देशातील कोरोनाबाधित रुग्णाचा हा तिसरा बळी आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची लागण होऊन दगावलेला हा पहिला रुग्ण आहे.