श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडणाऱ्या सुरक्षा दलांनी सोमवारी हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत अजून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान या चकमकीत पोलिसांचा एक जवान जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. त्यानंतर सावध असलेल्या पोलिसांनी हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर दिले. तसेच शोधमोहिम सुरू केली. त्याचदरम्यान उडालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीमध्ये पोलिसांचा एक जवान जखमी झाला आहे. या जवानाला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येविषयी माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, लष्कराने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणा-या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा पुतण्या तल्हा राशिद याला गेल्या आठवड्यात ठार मारले होते. गेल्या आठवड्यात दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अग्लर कंदी गावात लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये तीन दहशतवादी ठार झाले. त्यामध्ये तल्हा राशिदही होता.
गावातील दोन घरांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने त्या परिसराला वेढा घातला व कारवाई सुरु केली. या कारवाई दरम्यान एक जवानही शहीद झाला. 44 राष्ट्रीय रायफल्स आणि 182 केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीची शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली होती. या वर्षात दक्षिण काश्मीरमध्ये आतापर्यंत 72 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामध्ये दहा जैशचे दहशतवादी आहेत. दशकभरात प्रथमच इतक्य मोठया संख्येने दहशतवाद्यांना संपवण्यात आले आहे.