कोलकाता :पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापत चालले आहे. तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे.
आमदार दीपक हलदर यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण दीपक हलदर हे डायमंड हार्बर या मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे दीपक हलदर यांनी सोमवारी जाहीर केले.
दीपक हलदर यांचे म्हणणे काय?
तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देताना दीपक हलदर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मात्र, सन २०१७ पासून सर्वांसोबत काम करण्यापासून मला परावृत्त केले जात होते. माझ्या कोणत्याही गोष्टीला मान्यता, परवानगी दिली जात नव्हती. पक्षनेतृत्वाला याची वेळोवेळी कल्पना देऊनही दखल घेतली नाही. अथवा कोणतीच कारवाई केली गेली नाही. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाची मला दिली जात नव्हती. विधानसभा मतदारसंघातील जनता आणि समर्थकांना उत्तरे देण्यास मी बांधील आहे. म्हणूनच तृणमूल काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे दीपक हलदर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको
भाजप नेते सोवन चॅटर्जी संपर्कात
गेल्या काही दिवसांपासून दीपक हलदर पक्षनेतृत्वाविरोधात जाहीरपणे वक्तव्ये करत होते, असे सांगितले जात आहे. भाजप नेते सोवन चॅटर्जी यांच्याशी संपर्कात असून, दक्षिण कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी भेटही दिली होती. सन २०१५ मध्ये मारहाणीच्या आरोपामुळे दीपक हलदर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, अशी माहिती मिळाली आहे.
आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे
पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजप नेते राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. हावडा रॅलीत सुवेंदू अधिकारी यांनीही सहभागी होत तृणमूल काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.