नवी दिल्ली - राज्यातील रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला, अनेकांचं सांत्वन केलं. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले. तर, कोल्हापूर, सांगली, सातारा भागातही अतिवृष्टी झाल्याने अनेकजण मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या पूरग्रस्त नागरिकांना धीर देण्याचं काम खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसुबक अकाऊंटवरुन भली मोठी पोस्ट लिहिली आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, असे म्हणत उदयनराजेंनी पूरग्रस्त बांधवांना धीर दिला आहे. तसेच, प्रशासनाने वेगाने व प्रामाणिक मदत कार्य चालू ठेवावे जनतेला कमीतकमी त्रास होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही सरकार आणि प्रशासनाला केले आहे. वित्तहानी कितीही झाली तरी आज ना उद्या ती भरून काढता येईल. परंतु या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाधित भागातील मदत कार्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच मदत कार्य वेगाने व प्रामाणिकपणे सुरु करावे, मदत कार्य करताना जनतेला कमीतकमी त्रास होईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. अन्यथा पुरग्रस्त जनतेचे श्राप-अश्राप भोगावे लागतील, असेही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
दिल्लीत असलो तरी महाराष्ट्रात लक्ष
संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे असलो तरी देखिल आमचे लक्ष पूरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर पूर्णपणे महाराष्ट्र आणि विशेष करुन कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे आहे. या भागातील पूरस्थितीची आणि भौगोलिक परिस्थितीची माहिती आम्ही केंद्रीय गृहमंत्रालय आणि मदत मंत्रालयाला दिली असून, केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले.
असलेल्या की नसलेल्या कोरोनाने जनता त्रस्त
निसर्गाच्या आणि भोंगळकारभाराचे असे अनेक फटके दुर्दैवाने गेल्या काही वर्षात काही अंतराने जरा जास्तच बसू लागले आहेत. त्यातच गेल्या सुमारे दिड वर्षापासून असलेल्या का नसलेल्या कोरोनाने जनता त्रासून गेली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कटले आहे. संपूर्ण यंत्रणा कोलमडून गेली आहे. परंतु कोणीही खचून जावू नका, निसर्गाने संकटे दिली तरी त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द आणि विवेकदेखील निसर्गच देत असतो. सर सलामत तो पगड़ी पचास वा उक्तीप्रमाणे आपले आणि आपल्या कुटुंबाचे बहुमूल्य जीवन महत्वाचे आहे म्हणून सावधानता बाळगून संयम ठेवा. संसार पुन्हा उभा करता येईल, त्यासाठी आम्ही स्वतः तातडीने शक्य ते सर्वप्रकारचे मदतकार्य सुरु करीत आहोत.