मुंबई - जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी ( 19 जानेवारी ) केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ''आज जो पाकिस्तान नावाचा ‘दहशतवादी भस्मासुर’ थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे.त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवीत आहे. '', असं म्हटले आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय ?सीमेपलीकडून गोळीबार करणाऱ्या पाकड्या सैनिकांचा आपले जवान खात्मा करीत असले तरी पाकड्यांचे वाकडे शेपूट सरळ होताना दिसत नाही. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आमच्या नागरी वस्त्यांवर गोळीबार करण्याच्या आणि निरपराध्यांचे बळी घेण्याच्या त्यांच्या कुरापती सुरूच आहेत. मागील महिनाभरात हे वारंवार घडले आहे. सीमारेषेवरील आर. एस. पुरा सेक्टर, कठुआ, सांबा, अरनिया आदी भागांत गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. उखळी तोफांचाही मारा केला. त्यात आर. एस. पुरा सेक्टरमधील बचनोदेवी आणि सुनीलकुमार या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. वास्तविक बुधवारी रात्रीच आपल्या बीएसएफच्या जवानांनी तीन पाकड्या सैनिकांसह आठजणांचा खात्मा केला होता. त्याआधी सहा दहशतवादी आणि सात पाकिस्तानी जवानांना आपल्या लष्कराने ठार मारले होते. तरीही पाकड्यांच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत. तिकडे ‘२६/११’च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला संरक्षण द्यायचे. एवढेच नव्हे तर ‘क्लीन चिट’ द्यायची आणि हिंदुस्थानने दिलेले पुरावे कचऱ्याच्या डब्यात फेकायचे. अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे. हिंदुस्थानी लष्कराच्या धडक कारवायांनाही भीक घालायची नाही. पाकिस्तानचा हा बेमुर्वतखोरपणा वर्षानुवर्षे सुरू आहे. अमेरिका आज दहशतवादावरून त्या देशाला इशारे वगैरे देत असली, आर्थिक मदत थांबविण्याच्या धमक्या देत असली तरी आज जो पाकिस्तान नावाचा ‘दहशतवादी भस्मासुर’ थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे. त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवीत आहे. वर्षभरात हिंदुस्थानी लष्कराने प्रतिकारवाईत १३८ पाकड्या सैनिकांचा खात्मा केला. तरीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमावर्ती गावांमधील निरपराध्यांचे बळी घेण्याची त्यांची खुमखुमी संपलेली नाही. त्यांचे वळवळणारे शेपूट पूर्ण ठेचल्याशिवाय या कुरापती थांबणार नाहीत.