मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 09:37 AM2024-02-28T09:37:21+5:302024-02-28T09:38:09+5:30
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बंद झाली, दहशतवाद कमी झाला. गुंतवणूक येतेय. राज्याचा विकास सुरू आहे असंही शाह यांनी सांगितले.
नवी दिल्ली - Amit Shah on Uddhav Thackeray ( Marathi News ) मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं, घराणेशाही वाचवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आलेत. भाजपात प्रवेश केलेल्यांच्या कुठल्याही केसेस मागे घेतल्या नाहीत असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
अमित शाह म्हणाले की, विरोधकांची आघाडी ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेत. ज्यांना आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान करावं यासाठी एकत्रित आलेत. कुणालाही देशाची चिंता नाही. मुलाने मुख्यमंत्री बनावं हे उद्धव ठाकरेंचं लक्ष्य आहे. मुलगा, मुलगी, जावई, भाचे यांना सत्तेच्या पदावर बसवण्याच्या स्वार्थी हेतूने जमलेल्या पक्षांची टोळी आहे असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या ग्लोबल समिटमध्ये शाह यांची मुलाखत झाली. त्यात ते बोलले.
तसेच भाजपा कुणी आले म्हणून त्याच्यावरील केसेस बंद झाल्या असं नाही. कुणावरील गुन्हे मागे घेतले नाहीत. ईडीकडून ज्या कारवाया सुरू आहेत त्या तशाच आहेत. लाखो कोटी रुपये जप्त करण्यात आले हा देशातील काळ्या पैशाविरोधात अभियान आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला १३० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व म्हणून पंतप्रधान मोदी तिथे होते. तुम्ही पंतप्रधानांना भाजपाचं म्हणणार मग कसं चालेल? आम्ही मंदिर बनवलं, या देशातील ६० कोटी जनतेला ७० वर्ष काँग्रेसनं सन्मान दिला नाही. आम्ही १० वर्षात १० कोटी मातांच्या घरी चूल बंद करून गॅस दिला. ३ कोटी महिलांना घरे दिली. अनेक आरोग्य योजना आणल्या असंही शाह यांनी सांगितले.
कलम ३७० हटल्यानं जम्मू काश्मीरमध्ये शांतता
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बंद झाली, दहशतवाद कमी झाला. गुंतवणूक येतेय. राज्याचा विकास सुरू आहे. आज ३५ हजार लोक लोकप्रतिनिधी झालेत. याआधी केवळ ३ घराणे काश्मीरात कलम ३७० च्या नावाखाली लोकशाही दडपून बसले होते. आज तिथे सर्व सुरळीत आहे असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं.