Congress On Udhayandihi Stalin Sanatana Remarks: तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayandihi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर सत्ताधारी डीएमकेसह काँग्रेसवरही टीका करत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसह अमित शहा आणि इतर अनेक भाजप नेत्यांनी हिंदू धर्माच्या अपमानाचा आरोप केला.
आता या प्रकरणावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी (4 सप्टेंबर) पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, सर्व पक्षांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. काँग्रेसची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, सर्व धर्म समान आहेत, आम्ही सर्वांचा आदर करतो. पण, सर्व राजकीय पक्षांना त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.
एक देश-एक निवडणुकीवर भाष्यएक देश एक निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. यावरुन स्पष्टपणे दिसतंय की, भाजप इंडिया आघाडीला घाबरले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीची (CWC) पहिली बैठक 16 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर, 17 सप्टेंबर रोजी एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये CWC सदस्यांसह, सर्व राज्यांच्या कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आणि संसदीय पॅनेलचे अधिकारी देखील सहभागी होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?तामिळनाडू सरकारमधील क्रिडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. ते म्हणाले होते, "डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.