'बाबा! तुम्ही स्ट्रॉंग आहात, कोरोनाला हरवूनच यायचं', मृत्यूपूर्वी लेकीनं पोलीस बाबांकडून घेतलं होत वचन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 05:07 PM2020-04-22T17:07:33+5:302020-04-22T18:01:28+5:30
संबंधित अधिकाऱ्याने सोमवारी रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉलवरून कुटुंबीयांशी संवाद साधला होता, असे डॉक्टर सुमित ठक्कर यांनी सांगितले. या व्हिडिओ कॉल नंतर, संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीने डॉक्टरांना मेसेजही केला होता.
उज्जैन : कोरोना दिवसेंदिवस संपूर्ण देशात हात-पाय पसरत चालला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस कर्माचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. उज्जैन येथील नीलगंगा पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या एका 59 वर्षीय अधिकाऱ्याचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर इंदूर येथे उपचार सुरू होते. दुपारी इंदूर येथील रामबाग मुक्तिधाम येथे राजकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलीही उपस्थित होत्या. यावेळी एक मुलगी त्यांच्या फोटोला बिलगून ढायमोकळून रडत होती.
संबंधित अधिकाऱ्याने सोमवारी रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉलवरून कुटुंबीयांशी संवाद साधला होता, असे डॉक्टर सुमित ठक्कर यांनी सांगितले. या व्हिडिओ कॉलनंतर, संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीने डॉक्टरांना मेसेज केला होता, की "डॉक्टर तुमचे खूप-खूप आभार... तुम्ही त्यांची काळजी घ्या... प्लीज सर... केवळ तुमच्याकडूनच आम्हाला आशा आहे... धन्यवाद". या व्हिडिओ कॉलवर त्यांची मुलगीही बोलली होती. तेव्हा त्यांनी हातानेच इशारा करत 'मी बरा आहे', असे म्हटले होते.
असा होता संबंधित अधिकाऱ्याचा कुटुंबीयांशी अखेरचा संवाद -
मुलगी- बाबा तुम्ही कसे आहात?
आधिकारी हातानेच इशारा करत-खुप छान
मुलगी - बाबा, तुम्ही तर खूप स्ट्रॉंग आहात. तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवता. तुम्ही नक्कीच कोरोनाचा पराभव कराल.
अधिकारी मुलींना हातवारे करूनच हिम्मत ठेवायला सांगतात
मुलगी - बाबा, तुम्ही लवकर घरी याल ना?
पत्नी - बघा, आम्ही सगळे जण तुमची वाट बघत आहोत. लवकर घरी यावेच लागेल.
यानंतर संबंधित अधिकारी दोघींनाही आपल्या जवळ येण्याचा इशारा करतात.
कुटुंबीयांशी बोलल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी विश्रांती केली. यानंर मंगळवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी शनिवारीही इंदूरमध्ये कोरोनाशी लढताना एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.