यूएलएफने स्वीकारली काश्मिरातील ११ लोकांच्या हत्येची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:41 AM2021-10-19T06:41:18+5:302021-10-19T06:41:44+5:30
परप्रांतीय मजुरांना बाहेर जाण्याचा इशारा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत ११ नागरिकांच्या करण्यात आलेल्या हत्यांची जबाबदारी युनायटेड लिबरेशन फ्रंट (युएलएफ) या दहशतवादी गटाने घेतली आहे. काश्मीरमधील परप्रांतीय मजुरांनी खोरे सोडून जावे असा इशारा युएलएफने दिला आहे. देशात मुस्लिमांच्या अनेक ठिकाणी हत्या होत असून त्याचा आम्ही बदला घेणार आहोत असे लष्कर-ए-तय्यबाशी संलग्न असलेल्या युएलएफने म्हटले आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यांमुळे तेथील परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरूवात झाली आहे.
काश्मीरमध्ये रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली, त्याआधीही असा प्रकार घडला होता. हत्या झालेले नागरिक बिहार व उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवासी होते. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये झालेल्या ११ नागरिकांच्या हत्यांची जबाबदारी स्वीकारणारे एक निवेदन युएलएफने जारी केले आहे. या गटाच्या दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांच्या निवासस्थानांमध्ये घुसून रविवारी गोळीबार केला होता. त्यात दोन जण ठार झाले. त्याआधी शनिवारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात बिहार व उत्तर प्रदेशमधील दोन मजुरांना जीव गमवावा लागला.
या मजुरांना सुरक्षा दलांच्या छावण्यांसह अन्य सुरक्षित ठिकाणी तातडीने हलविण्याची प्रक्रिया रविवार रात्रीपासून सुरू झाली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे हे मजूर भयभीत झाले आहेत.
लष्करप्रमुख नरवणे काश्मीर दौऱ्यावर
जम्मू-काश्मीरमध्ये परप्रांतीयांच्या हत्या होत असून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे हे सोमवारपासून त्या भागाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. ते सीमेवरील विविध ठिकाणांना भेट देऊन अधिकारी व जवानांशी चर्चा करतील.