उल्फाचा जहाल नेता चेतिया भारताच्या स्वाधीन

By admin | Published: November 12, 2015 03:24 AM2015-11-12T03:24:27+5:302015-11-12T03:24:27+5:30

भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले

ULFA's radical leader Chetia is independent of India | उल्फाचा जहाल नेता चेतिया भारताच्या स्वाधीन

उल्फाचा जहाल नेता चेतिया भारताच्या स्वाधीन

Next

नवी दिल्ली : भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर बांगलादेश सरकारने बुधवारी सकाळी त्याला भारताच्या ताब्यात दिले. अर्थात या साऱ्या प्रक्रियेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ईशान्य भारतातील शांततेसाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेला या घटनेतून आसाममध्ये अधिक चालना मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियाने मुंबईतील कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला भारताच्या ताब्यात दिले. त्यानंतर लगेचच ही महत्त्वपूर्ण घटना झाली आहे. ४८ वर्षीय चेतिया हा बंदी घालण्यात आलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ आसाम (उल्फा)चा संस्थापक सरचिटणीस आहे. हत्याकांड, अपहरण, बँकेवरील दरोडे
आणि खंडणी वसुलीसारख्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तो भारतास हवा होता. गेली दोन दशके
भारत चेतियाच्या हस्तांतरणासाठी पाठपुरावा करीत होता. मात्र, उभय देशांत प्रत्यार्पण करार नसल्याचे सांगून तेथे आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सरकारांनी त्याच्या हस्तांतरणास नकार दिला होता. मात्र,अलीकडे स्वत: चेतिया यानेच ‘आपण भारतात परतण्यास उत्सुक आहोत’, असा लेखी अर्ज दिल्यानंतर बांगलादेशातील हसीना सरकारने त्याला भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेतला.
-------
चेतियाची पार्श्वभूमी...
१९९० च्या दशकात चेतिया हिंसक कारवायांनंतर भूमिगत झाला. त्यानंतर मार्च १९९१ मध्ये त्याला अटक करण्यात आली; पण आसामचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी त्याला कारागृहातून जामिनावर सोडून दिले आणि मुक्तता होताच तो फरार झाला. तेव्हाच तो बांगलादेशात गेला असण्याची अटकळ होती. ती खरी ठरली. २१ डिसेंबर १९९७ रोजी त्याला हसीना यांच्या पहिल्या राजवटीत बांगलादेश सरकारने अटक केली होती. त्यावेळी त्याला विदेशी नागरिक कायदा, पासपोर्ट कायदा यांचा भंग केल्याचा आणि बांगलादेशात अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. याशिवाय बेकायदेशीरपणे विदेशी चलन, शस्त्रास्त्रे आणि सॅटेलाईट फोन बाळगणे आदी आरोपही ठेवण्यात आले होते. त्यासाठी ठोठावलेली सात वर्षांची शिक्षा तेथे भोगल्यावर त्याने राजकीय शरणार्थी म्हणून आपला स्वीकार करण्याची विनंती बांगलादेश सरकारला तीनदा केली. त्यावर सरकारने निर्णय घेतला नव्हता. परिणामी हा निर्णय होत नाही, तोवर सुरक्षिततता म्हणून चेतियाला तुरुंगातच ठेवण्याचा आदेश ढाका हायकोर्टाने दिला होता.
---------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रत्यार्पणासाठी केलेल्या सहकार्याबद्दल शेख हसीना यांचे आभार मानले आहेत.

Web Title: ULFA's radical leader Chetia is independent of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.