महिलेच्या पोटात जुळं बाळ असल्याचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट; मात्र प्रसूतीनंतर घडलं वेगळंच, रुग्णालयात गोंधळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:10 PM2024-01-01T12:10:40+5:302024-01-01T12:11:36+5:30
रेखा कुमार या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लखनौ : उत्तर प्रदेशातील बस्ती परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा महिला रुग्णालयातून एक मूल गायब झाल्याची तक्रार प्रसूती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. महिलेची प्रसूती होण्याआधी आलेल्या अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये दोन मुलं असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र प्रत्यक्ष प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून एकच मूल सोपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर सदर महिलेच्या नातेवाईकांना रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातल्याचं बघायला मिळालं.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दुबखरा गावातील रहिवासी असलेल्या रेखा कुमार या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसूतीनंतर तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये जुळी मुलं दाखवत असताना डॉक्टरांनी आमचं एक मूल गायब केलं आहे का, असा प्रश्न उपस्थित करत नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
महिलेचा पती रामेश कुमार याने स्थानिक प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "मी २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता माझ्या पत्नीला रुग्णालयात भरती केलं. सायंकाळी ५ वाजता ऑपरेशन झालं आणि डॉक्टरांनी आमच्याकडे एक मूल सोपवलं. मात्र अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये माझ्या पत्नीच्या पोटात दोन मुलं असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने आमचं एक मूल गायब केल्याचा संशय आहे," असा आरोप रामेश कुमार या व्यक्तीने केला आहे.
आरोपांची चौकशी होणार
प्रसूती झालेल्या महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीची रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून याप्रकरणी एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडून तपास पूर्ण झाल्यानंतरच याप्रकरणातील सत्य समोर येणार आहे.