अयोध्या : अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज होणार आहे. या सोळ्यात माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी 'राम की मर्यादा से बंधी हूं', असे म्हणत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. यावेळी उमा भारती म्हणाल्या की, "मी मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मर्यादेला बांधील आहे. मला रामजन्मभूमी ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी निर्देश दिले आहेत, त्यामुळे मी या सोहळ्यात उपस्थित राहणार आहे."
यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी राम मंदिर भूमिपूजनच्या सोहळण्यातील निमंत्रितांच्या यादीतून आपले नाव हटवण्यास सांगितले होते. यावेळी त्यांनी अयोध्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात येणार, मात्र मंदिर ठिकाणी न थांबता शरयू नदीच्या काठी थांबणार असल्याचे सांगितले होते.
उमा भारती यांनी ट्विट केले होते की, जेव्हापासून अमित शाह तसेच यूपी भाजपाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले, तेव्हापासून मी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी चिंतित आहे. त्यामुळे मी रामजन्मभूमी ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे की, भूमिपूजन सोहळ्यादरम्यान मी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर उपस्थित असणार आहे." याचबरोबर, पंतप्रधान मोदी आणि इतर लोक गेल्यानंतर आपण रामलल्लाचे दर्शन घेऊ, असेही उमा भारती यांनी म्हटले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत.
देशात बहुधा प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं असल्याने रामभक्त आणि श्रद्धाळू अत्यंत आनंदात आहेत. अयोध्येत ५ ऑगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.