उमा भारती लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:11 PM2019-03-23T13:11:54+5:302019-03-23T13:52:56+5:30
भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी (22 मार्च) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. 2016 मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली - भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी (22 मार्च) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. 2016 मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून तिर्थयात्रेला जाण्यासाठी उमा भारती निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र आता त्यांनीच लोकसभा 2019 निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट केले आहे.
'मी 2016 मध्येच निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे. जर मी निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. मी माझा मतदारसंघ कधीही बदलू शकत नाही. तेथील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानत आहेत' असं उमा भारती यांनी म्हटले आहे. तसेच पुढे दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उमा भारती यांनी '2024 मध्ये निवडणूक लढवेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शानदार बहूमत मिळवेन' असं म्हटलं आहे. आगामी निवडणूका न लढवण्याची माहिती भाजपा महासचिव रामलाल यांना दिली होती. रामलाल यांनी उमा भारतींना तीर्थयात्रेसाठी जाण्याआधी पक्षासाठी प्रचार करण्याबाबत सांगितले होते. 'पक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत खूप काही दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी 5 मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार आहे' असं उमा भारती यांनी सांगितलं आहे.