शरद पवारांकडून कृषी कायद्यांबाबत दिशाभूल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:42 AM2021-02-01T04:42:56+5:302021-02-01T04:43:46+5:30
Farmer News : नव्या कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जनतेची दिशाभूल करत असून, हे चित्र निराशाजनक आहे, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली.
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जनतेची दिशाभूल करत असून, हे चित्र निराशाजनक आहे, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली. नव्या कायद्यांत आहेत तशाच कृषी सुधारणा करण्याचा शरद पवार यांनी याआधी जोरकस प्रयत्न केला होता, असेही तोमर म्हणाले.
तोमर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कृषी कायद्यांमुळे बाजार समित्या किंवा मंडई व्यवस्था दुबळी होईल, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल केवळ राज्यातच नव्हे; तर राज्याबाहेर विकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, असेही तोमर म्हणाले.
बाजार समित्या, मंडई व्यवस्थेवर परिणाम नाही
केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी म्हटले आहे की, शेतमालाला मिळणाऱ्या किमान हमी भाव, बाजार समित्या, मंडई व्यवस्थेवर नव्या कृषी कायद्यांमुळे कोणताही परिणाम होणार नाही. या कायद्यांमुळे बाजार समित्या, मंडयांमधील व्यवस्था अधिक स्पर्धात्मक होईल तसेच तेथील सोयीसुविधाही वाढीला लागतील.